भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली

निर्णय प्रक्रियेतील वाद शिगेला

गडचिरोली : नगर परिषद निवडणूक आणि त्यानंतरच्या घडामोडींमध्ये झालेली उलथापालथ यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. आमदार डॅा.मिलिंद नरोटे आणि निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेले माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यात वर्चस्व आणि डावलले जाण्यावरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. यातच सोमवारी संध्याकाळी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर एका पदाधिकाऱ्याला घरी पाठवून हा संघर्ष थांबवण्यात उपस्थित पदाधिकाऱ्यांना यश आले.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी संध्याकाळी आयोजित केली होती. यावेळी लगतच्या घडामोडींवर चर्चा करण्यात आली. आमदार डॅा.नरोटे यांनी मला विश्वासात न घेता आणि डावलून निर्णय घेतले जात असल्याची तक्रार मांडली. पण मी मिळालेल्या अधिकारानुसार योग्य काय ते ठरवले, असे सांगण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्याने केला. हे सांगताना त्यांचा आवाज चढला. त्यामुळे आमदारांनी त्या पदाधिकाऱ्याला आपल्या पद्धतीने ‘समज’ दिल्याचे समजते. काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत त्यांना एकमेकांपासून दूर केले.

यानंतर त्या पदाधिकाऱ्याने तेथून निघून जात आपले घर गाठले. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पहिल्यांदाच असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.