पायाभूत सुविधांसह दर्जेदार शिक्षण व आरोग्यावर डॅा.मिलिंद नरोटे यांचा भर

'महायुतीचे सर्व उमेदवार जिंकणार'

गडचिरोली : गडचिरोली मतदार संघच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी पायाभूत सुविधांची कमतरता पूर्ण करून शिक्षण, आरोग्याची सेवा दर्जेदार देणे आणि युवक तथा शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यावर आपला भर राहणार असल्याचा संकल्प डॅा.मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार म्हणून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॅा.नरोटे यांनी हा संकल्प जाहीर केला. दरम्यान स्थानिक विकास कामांसह महायुती सरकारच्या कार्यकाळातील विविध योजनांमुळे जिल्ह्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा कौल मिळेल, असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) तथा माजी खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, बाबुरावजी कोहळे, प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, डॅा.चंदा कोडवते, आशिष पिपरे, रमेश भुरसे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रपरिषदेत प्रदेश भाजपतर्फे जाहीर केलेल्या संकल्पपत्रातील मुद्द्यांसोबत जिल्ह्यातील कोणत्या मुद्द्यांवर भर दिला जाणार याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यासाठी मंजूर केंद्रिय विद्यालयाच्या उभारणीतील अडथळे दूर करणे, ओबीसी मंत्रालयाची मागणी, ओबीसी वसतिगृह सुरू केले पण त्यासाठी सरकारी इमारतीची उभारणी, आश्रमशाळांचा दर्जात्मक सुधारणा, युवकांसाठी सुसज्ज क्रीडांगण, स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सुविधा, वनपर्यटन अशा अनेक मुद्द्यांवर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अमित शाह, नितीन गडकरींच्या सभा

भाजपला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी छत्तीसगड, तेलंगणातील प्रवासी कार्यकर्ते एक महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. याशिवाय येत्या 15 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आष्टी आणि कुरखेडा येथे सभा, तर 17 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा गडचिरोलीत होणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी दिली.

अहेरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्यावर भाजपने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याबाबतचा निर्णय प्रदेशस्तरावर घेतला जाईल, असेही यावेळी जिल्हाध्यक्षांनी सांगितले.