‘काँग्रेस’ला रामराम ठोकून डॉ़.प्रमोद साळवे राकाँत दाखल

निवडणुकीच्या तोंडावर दुसरा धक्का

गडचिरोली : एकीकडे वातावरणातील थंडी वाढत असताना राजकीय वातावरण मात्र तापत आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग येत आहे. गेल्या आठवड्यात देसाईगंज येथील काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी आणि अॅड.संजय गुरु यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला केल्यानंतर आता काँग्रेसचे डॉक्टर सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस डॉ़.प्रमोद साळवे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंगळवारी (दि.11) देसाईगंज येथे माजी मंत्री तथा आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला़.

धानोरा तालुक्यासह जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असलेल्या डॉ़.प्रमोद साळवे यांचा ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश काँगेसला दुसरा धक्का ठरला आहे. डॉ.साळवे हे गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत़. त्यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या डॉक्टर्स सेलचे राज्य सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली आहे़. परंतु काही अंतर्गत कारणांमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान देसाईगंज येथे अॅड.संजय गुरु यांच्या निवासस्थानी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी वरिष्ठ नेत्यांसमक्ष त्यांना पक्षाचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सचिव नाना नाकाडे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, ज्येष्ठ नेते अॅड.संजय गुरु आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़.

जिल्ह्यातील तीनही नगर परिषदेत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा राकाँतील प्रवेश नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलविणारा ठरू शकतो. राकाँने अवलंबलेले हे धक्कातंत्र जिल्ह्यात चर्चेचा विषय होत आहे़.

समर्पित भावनेने करणार काम- डॉ.साळवे

ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात विकासात्मक कामांचा झपाटा सुरु आहे़. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण समर्पित भावनेने काम करत राहणार, अशी प्रतिक्रिया डॉ.प्रमोद साळवे यांनी दिली.