विकास नाही म्हणून जातीपातीचे विष पेरून भांडण लावले जात आहे

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टिका

चामोर्शी : गडचिरोलीसाठी महत्वाचे असलेले उद्योग असो किंवा सिंचन प्रकल्प असो, कशासाठीही इथल्या लोकप्रतिनिधींनी काम केले नाही. विकास केला नाही म्हणूनच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांधता व जातीपातीचे विष पेरून भांडण लावण्यात येत आहे, अशी टीका ना.विजय वडेट्टीवार यांनी केली.

गडचिरोली जिल्हयातील चित्तरंजनपूर (येणापूर) येथे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

गेले 10 वर्ष गडचिरोलीचे नुकसान झाले आहे. येथील लोकप्रतिनिधी मतदारसंघातही दिसले नाही आणि संसदेतही त्यांनी कधी गडचिरोलीचे प्रश्न उपस्थित केले नाही. त्यामुळे आता आपले नुकसान करू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान म्हणाले, भाजप सांगत आहे उमेदवाराकडे बघू नका, पण मोदींना बघून मत द्या. पण तुमच्या घरी काही समस्या असली की मोदी येणार की स्थानिक खासदार? असा सवाल डॉ. किरसान यांनी विचारला.

या सभेत माजी खासदार मारोतराव कोवासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.राम मेश्राम, भारिपचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, युवक काँग्रेसचे नेते विश्वजित कोवासे, प्रमोद भगत, बिजम सरकार, के.डी. मेश्राम, अश्विनी कुंभरे, रतन अक्केवार, सुधाकर गद्दे, प्रेमानंद मल्लिक, विकास पोतराजवार, स्वाती टेकाम, नीलकंठ निखाडे, निकेश गद्देवार, निनाद देठेकर, रुपाली निखाडे तसेच महाविकास आघाडीचे व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

संविधानावर घाला घालून मनुस्मृति विचारांचे हुकुमशाही सरकार चालवू पाहणाऱ्यांना व त्यांना साथ देणाऱ्यांना समाजाने बहिष्कृत करून महाविकास आघाडीलाच संविधान वाचविण्यासाठी अमूल्य मत द्या, असे आवाहन भारिपचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, ॲड.राम मेश्राम यांनी केले. महागाईने गरिबांचे रक्त शोषणाऱ्या सरकारला पायउतार करा, असे अतुल गण्यारपवार म्हणाले. याप्रसंगी चित्तरंजनपूर (येनापुर) व परिसरातील महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बुथ प्रमुख व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.