गडचिरोली : जिल्ह्यातच नाही तर राज्यात चर्चेत असलेल्या अहेरी विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून निर्माण झालेला सस्पेन्स कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून माजी आमदार दीपक आत्राम हेसुद्धा ईच्छुकांच्या यादीत आले आहेत. वर्षभरापूर्वी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचा झेंडा हाती घेणाऱ्या दीपक आत्राम यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकण्याची ईच्छा व्यक्त करत उमेदवारी मागितली आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) मध्ये प्रवेश करणाऱ्या भाग्यश्री आत्राम यांनी उमेदवारीसाठी अद्याप पक्षाकडे अर्जच केला नसल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी सांगितले.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या (शप) विदर्भातील ईच्छुक उमेदवारांच्या येत्या रविवारी पुण्यात मुलाखती होणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत ज्या उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले त्यांची यादी पक्षाने जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांना पाठवून त्या ईच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी येण्याचा निरोप देण्यास सांगितले. पण त्या यादीत भाग्यश्री आत्राम यांचे नाव नाही.
दीपक आत्राम हे 2009 ते 2014 या कालावधीसाठी अहेरी मतदार संघातून अपक्ष (आदिवासी विद्यार्थी संघ) लढून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना यश आले नाही. वर्षभरापूर्वी त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता, पण त्या पक्षाला तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत आणि नंतर लोकसभा निवडणुकीत मिळालेले अपयश पाहून दीपक आत्राम पुन्हा पक्षबदल करण्यास ईच्छुक असल्याचे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडे अहेरीतून माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह भाजपच्या युवक आघाडीचे पदाधिकारी संदीप कोरेत यांनीही उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. दुसरीकडे अहेरी आणि आरमोरी विधानसभा मतदार संघातूनही प्रत्येकी एका ईच्छुकाचे अर्ज आले असल्याचे गण्यारपवार यांनी सांगितले. अहेरीची जागा महाविकास आघाडीत कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिल, असे गण्यारपवार यांनी ठामपणे सांगितले. अशा स्थितीत हा मतदार संघ आपल्याकडे यावा यासाठी काँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना कितपत यश येते हे लवकरच दिसून येईल. तूर्त उमेदवारी कोणाला मिळते याच्याही आधी महाविकास आघाडीत हा मतदार संघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला येतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.