आरमोरी : पाथरगोटा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी आमदार कृष्णा गजबे यांचा श्री बाल गणेश उत्सव मंडळ पाथरगोटा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. “रुसली साडी माहेरची” या संगीतमय नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी हा सत्कार सोहळा झाला.
गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला पाथरगोटा ग्रामपंचायतीचा प्रश्न मा.आ.कृष्णा गजबे यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावला. पळसगाव ग्रामपंचायतमधून वेगळे करून स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून पाथरगोटा ग्रामपंचायतची स्थापना झाली आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 1100 असून, सुविधांचा अभाव असल्याने गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली होती. जिल्हा परिषदेतून शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे.
“ग्रामपंचायत मिळविण्याचे श्रेय पाथरगोटावासीयांच्या एकजुटीला जाते. खरे मानकरी तुम्हीच आहात. ग्रामपंचायतच्या मंजुरीसाठी फाईलला ग्रामपंचायतमधून पंचायत समितीकडे, पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे, जिल्हा परिषदेतून कमिश्नर ऑफिसकडे आणि तिथून मंत्रालयापर्यंत टेबल टू टेबल स्वतः नेऊन मंजुरी मिळवावी लागली. हा प्रवास सोपा नव्हता, पण गावकऱ्यांच्या पाठबळामुळे हे मला करणे शक्य झाले”, अशी भावना यावेळी गजबे यांनी व्यक्त केली.
आरक्षणाचा वाद कायम
गावात अनुसूचित जमातीची संख्या नसतानाही 1980-85 च्या अधिसूचनेनुसार नवरगाव व पाथरगोटा हे पेसाच्या यादीत समाविष्ट असल्याने येथे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. परिणामी ओबीसी व इतर प्रवर्गातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या प्रश्नावर देखील माजी आमदार गजबे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याची माहिती देण्यात आली.
या सोहळ्याला माजी आरोग्य सभापती भारत बावनथडे, भाजपचे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे, अमोल खेडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.