माजी खा.नेते भाजपचे स्टार प्रचारक, सेमाना देवस्थानात पुजा करून सुरूवात

डॅा.नरोटे यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, माजी खासदार अशोक नेते यांना भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारक म्हणून जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांसह देशातील 40 नेत्यांचा या यादीत समावेश आहे. त्यात अशोक नेते यांनाही स्थान देण्यात आले.

महाराष्ट्राच्या हिताचे महायुती सरकार पुन्हा आणण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने निभावण्याचा माझा प्रयत्न राहिल. महायुती सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह उघडे पाडणे यावर माझा भर राहणार असल्याचे नेते यांनी सांगितले. या जबाबदारीसाठी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आभार व्यक्त केले.

दरम्यान गडचिरोली विधानसभेचे भाजपचे तिकीट डॅा.मिलिंद नरोटे यांना मिळाल्याचे कळताच गडचिरोलीतील सेमाना देवस्थान मंदिरात हनुमान चालिसाचे वाचन आणि पूजाअर्चा केली. विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक या नात्याने अशोक ‌नेते यांनी डॉ.मिलिंद नरोटे यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे अभिनंदन केले. यानंतर नेते यांच्या निवासी कार्यालयातही अनेक पदाधिकाऱ्यांनी स्टार प्रचारक झाल्याबद्दल अशोक नेते आणि तिकिटासाठी डॅा.नरोटे यांचे अभिनंदन केले.