10 वर्षात जेवढी ठोस कामे झाली तेवढी यापूर्वी कधीही झाली नाही

कुठे कमी पडलो? नेतेंनी केले स्पष्ट

चामोर्शी : समाजसेवेतून माझ्या राजकीय जीवनाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे समाजातील प्रश्नांची आणि विकासाच्या दृष्टीने असलेल्या लोकांच्या गरजांची मला कल्पना आहे. त्यातूनच समाजोपयोगी आणि दीर्घकालीन अशी अनेक ठोस कामे माझ्या 10 वर्षाच्या कार्यकाळात झाली. मात्र ती कामे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आपण कमी पडलो. अन्यथा या क्षेत्रात आपला पराभव होऊ शकला नसता, अशी खंत माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी व्यक्त केली.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत चामोर्शी शहर व तालुका कार्यकारिणीची बैठक सावतेली समाज सभागृह चामोर्शी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी नेते यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाची सुरूवात, ब्रॉडगेज लाईनच्या सर्व्हेक्षणाची मंजुरी, चिचडोह, कोटगल बॅरेजेस, मेडिकल कॅालेज, कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ निर्मिती, सुरजागड लोह प्रकल्प, कोनसरी प्रकल्प तसेच साडेचौदा हजार कोटींच्या विविध रस्त्यांची कामे अशा अनेक विकासात्मक कामांचा पाढा वाचला. यापूर्वी कधीही एवढी विकासकामे कोणी केली नाही. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना ही कामे सांगण्यात आपण कमी पडलो. दुसरीकडे विरोधकांनी संविधानाबाबत केलेला अपप्रचार आणि महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडेआठ हजार रुपये टाकण्याचे खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभुल केली. असे खोटे प्रचारतंत्र खोडून काढत कार्यकर्त्यांनी विकासाची वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी. आगामी विधानसभेत विजय आपलाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मा.खा.नेते पुढे म्हणाले, मी आमदार असताना अगोदर चामोर्शी ग्रामपंचायत होती. त्यावेळी सरपंच भाजपचे जेष्ठ नेते माणिक कोहळे यांच्या पत्नी कोहळेताई होत्या. त्यावेळी मी आढावा घेऊन चामोर्शीतील कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले. पण तत्कालीन नियमानुसार 15 टक्के रक्कम भरण्याची व्यवस्था ग्रामपंचायतकडे नव्हती. त्यामुळे मी आपल्या फंडातून पैसे भरून चामोर्शीतील नागरिकांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. चामोर्शीतील न्यायालय असो, की मार्कंडा देवस्थानचे काम असो, विकास कामांत मी कधीही मागे राहिलो नाही. पुढेही शक्य ते सर्व करत राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन अशोक नेते यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.नितिन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, नगरसेविका रोशनी वरघंटे, बुद्धिजीवी प्रकोष्ठचे माजी न्यायाधिश सुनील दीक्षित, युवा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजप नेते संजय पंदीलवार, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निखिल धोडरे, ता.महामंत्री विनोद गौरकर, संजय खेडेकर, सोशल मिडीयाचे प्रमुख रमेश अधिकारी, शहर महामंत्री माणिक कोहळे, वासुदेव चिंचघरे अशा अनेक पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीप चलाख यांनी केले.