गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे केलेले आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला सकारात्मक कृतीत रूपांतरित करत, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी एक लाख रुपयांची थेट मदत दिली आहे.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत डॉ.नेते यांनी सोमवार, दि.21 जुलै रोजी आयसीआयसीआय बँकेमार्फत हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवसाचा सार्वजनिक उत्सव न करता समाजोपयोगी कार्यासाठी निधी वापरण्याचे आवाहन केले होते. जाहिराती, फलक, पुष्पगुच्छ किंवा हार यावर अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन करत त्यांनी लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना विधायक उदाहरण घालून दिले होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणे, तसेच अत्यवस्थ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून केला जातो. त्यामुळे या निधीला दिलेले योगदान म्हणजे माणुसकीच्या कार्यात केलेली प्रत्यक्ष मदत होय.
त्यामुळे इतर लोकप्रतिनिधी, समाजसेवक व नागरिकांनी आपापल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहभाग नोंदवावा, असे नम्र आवाहन डॉ.नेते यांनी केले.