
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत चामोर्शी महामार्गावरील गोविंदपूर (येवली) येथे ‘विला अर्बन शेतकरी उत्पादक कंपनी’च्या सभागृहात शेतकरी (किसान) संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते पक्षध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, तालुका महामंत्री बंडू झाडे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, साईनाथ बुरांडे, यशवंत कुळमेथे, किशोर गटकोजवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संवाद साधताना डॉ.नेते यांनी किसान मोर्चाचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, शेतमालाला योग्य हमीभाव, तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत अशा या योजनांचा मोठा लाभ होत असून, शेतकरी वर्ग सशक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल रमेश भुरसे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांचाही सन्मान करण्यात आला.































