गडचिरोली : शिवसेनेचे (शिंदे) नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यानिमित्त विश्राम भवनावर जमलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. दोन पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावले. पण वेळीच बाकी लोकांनी आवर घातल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी मंत्री दादा भुसे गडचिरोलीतून चंद्रपूरच्या दिशेने रवाना होताच घडली.

शिवसेना शिंदे गटाच्या गडचिरोली शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षा मोरे यांना संदीप ठाकूर गटातून अपशब्दात बोलल्यामुळे संतप्त झालेल्या युवा सैनिकांनी एका पदाधिकाऱ्याला चोप दिला. हे तत्कालीक कारण असले तरीही शिवसेनेते संदीप ठाकूर यांची जिल्हा प्रमुख नियुक्ती झाल्यापासून दोन गट निर्माण होऊन त्यांच्यात धुसफूस सुरू होती.
दोन महिन्याअगोदर गडचिरोली जिल्ह्यात दोन शिवसेना प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. त्यात आधीपासून जिल्हाप्रमुख असलेल्या राकेश बेलसरे यांच्याकडे अहेरी क्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून, तर गडचिरोली-आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप ठाकूर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. ठाकूर यांच्या नियुक्तीला जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध होता. नंतर हा विषय शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी असताना संदीप ठाकूर यांनी गडचिरोली व आरमोरी क्षेत्रात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सुरूवात केल्याने शिवसैनिक संभ्रमात होते. त्यातून गटबाजी आणखी उफाळली.
शिक्षणमंत्री दादा भुसे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असताना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सर्किट हाऊसवर जमले होते. मंत्री भुसे गेल्यानंतर बेलसरे गटाने संदीप ठाकूर यांना नियुक्तीला स्थगिती असताना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या का करता असे विचारले. यावेळी झालेल्या वादात शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षा मोरे यांना ठाकूर गटातून अपशब्दात बोलण्यात आले. त्यामुळे युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यातून काही पदाधिकारी एकमेकांशी भिडले. मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत त्यांना आवरले.