धर्मरावबाबांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडून शिक्कामोर्तब

मुंबईतील आढावा बैठकीत व्यक्त केला निर्धार

गडचिरोली : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी उमेदवारांची खांदेपालट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सलग दोन वेळा या मतदार संघात काँग्रेसला हार पत्करावी लागल्याने आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार दावा केला आहे. माजी राज्यमंत्री आणि अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी या मतदार संघात लढण्याची तयारी सुरू केल्यानंतर बुधवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात चुळबूळ सुरू झाली आहे.

या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, विरोधीपक्ष नेते अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, राजेश टोपे, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, प्राजक्त तनपुरे, महेबुब शेख या सर्व नेते मंडळीनी लोकसभा शेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, युवक जिल्हा अध्यक्ष, महिला अध्यक्ष यांना विविध सूचना केल्या.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीने राज्यातील 48 लोकसभा क्षेत्र व उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने बुधवार, दि.14 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीकरीता गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभेतील प्रमुख नेते व पदाधिकारी, तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभेतील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. चर्चाअंती लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावी, असा एकमताने निर्धार करण्यात आला.

या बैठकीला आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, युवक कार्याध्यक्ष नितीन भटारकर, महिला विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, चंद्रपूर महिला अध्यक्ष बेबी उईके, कपिल बागडे, फईम काजी, ग्यानकुमारी कौशिक तसेच विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.