‘खुल जा ईव्हीएम…’ ग्रामपंचायतीच्या रिंगणातील उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला

तालुका मुख्यालयी मंगळवारी होणार मतमोजणी

गडचिरोली : जिल्ह्याच्या सहा तालुक्यात १८ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यातील ५३४ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला मंगळवार दि.७ रोजी होणार आहे. संबंधित तालुका मुख्यालयी सकाळी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. यातील बहुतांश गावे दक्षिण गडचिरोलीचा गड असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हॅाट असणाऱ्या या मतदार संघात सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे कसब पणाला लागले आहे.

सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ तालुक्यांतील ३७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम लावला होता. त्यापैकी गडचिरोली तालुक्यातील एकमेव देवापूर ग्रामपंचायतमध्ये सर्व उमेदवार अविरोध निवडल्या गेले, इतर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये कोणीच उमेदवारी दाखल केली नाही. आणखी काही ठिकाणी काही ठिकाणी उमेदवारांची निवड अविरोध झाली. त्यामुळे अवघ्या १८ ग्रामपंचायतींमध्येच सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. त्यात कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश होता.

दुर्गम आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशिल भाग असतानाही रविवारी त्या ठिकाणी कोणताची अनुचित प्रकार न घडता ६६.९७ टक्के मतदान झाले. याशिवाय दोन तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठी ६३.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी सर्व मतदान यंत्र (ईव्हीएम) तालुका मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये पोहोचवण्यात आले.