ग्रामसभेच्या उमेदवारामुळे वाढणार अहेरीत महाविकास आघाडीची अडचण

यावेळी कोणालाच पाठिंबा देणार नाही

गडचिरोली : अहेरी विधानसभा मतदार संघात यावेळी महायुती, महाविकास आघाडी, संभावित बंडखोरांसह आता ग्रामसभेनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखीच वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत ग्रामसभेच्या भक्कम पाठिंब्याने काँग्रेसला (महाविकास आघाडीला) या विधानसभा मतदार संघात आघाडी घेणे शक्य झाले होते. मात्र यावेळी ग्रामसभेने कोणालाही पाठिंबा न देता आपला उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

ग्रामसभांच्या संमेलनात ठरल्यानुसार आपला प्रतिनिधी म्हणून नितीन पदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय ग्रामसभांनी घेतला. त्यामुळे आदिवासीबहुल गावांमधील ग्रामसभेचा प्रभाव असलेली बहुतांश मते पदा यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त प्रमाणात बसेल.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात ग्रामसभांचा मोठा वाटा होता. मात्र नवीन खासदारांनी आमचे विषय मांडलेच नाही, असे सांगत ग्रामसभांनी आपला भ्रमनिरास झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला. त्यासाठी आम्ही आमचाच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याचे पदा यांनी सांगितले.

दरम्यान महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाकडे राहते की काँग्रेसच्या कोट्यात जाते, आणि उमेदवार कोण राहणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. येत्या दोन-तीन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.