जनकल्याण यात्रेतून राष्ट्रवादीचे देसाईगंजमध्ये शक्तीप्रदर्शन

आविसं पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत आ.डॅा.धर्मरावबाबा आत्राम, तनुश्री आत्राम, मा.आ. रामकृष्ण मडावी, रविंद्र वासेकर, नाना नाकाडे व इतर.

देसाईगंज : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनकल्याण यात्रेला देसाईगंज येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या सभेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी माहौल तयार केला. यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे सिरोंचा येथील नेते बानय्या जंगम, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, मोहन पुराम यांच्यासह भाजपचे भाग्यवान टेकाम आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे आपल्या पक्षाला बळ मिळाले असले तरीही महायुतीसोबत राहूनच निवडणूक लढविण्याची आपली भूमिका असल्याचेही धर्मरावबाबांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. चर्चेतून मार्ग निघू शकतो, मात्र त्यासाठी चर्चा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, ‘आमच्या सरकारने लाडकी बहीणसारखी योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या आणि ओबीसी समाजाच्या आम्ही सदैव पाठीशी आहोत. राज्यात अनेक कल्याणकारी योजना आमच्या सरकारने कार्यान्वित केल्या आहेत. 1991 साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आपण देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे नागरिकांचा विविध प्रमाणपत्रांसाठी गडचिरोलीला जाण्याचा त्रास कमी झाला.’ ते पुढे म्हणाले, ‘देसाईगंज शहरात आजही प्रॉपर्टी कार्डची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. पेसाचा प्रश्नही आहेच. गेल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनात मी या भागातील अनेक नेते बघितले, पण त्यांनाही हे प्रश्न सोडविता आले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला संधी दिल्यास हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार,’ असे आश्वासन आत्राम यांनी यावेळी दिले.

‘शहरासाठी भव्य नाट्यगृह मीच मंजूर केले. यामुळे झाडीपट्टी रंगाभूमीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला सत्ता दिल्यास याहून अधिक विकास कामे आपल्या परिसरात करणार,’ असे आ.आत्राम यावेळी म्हणाले.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी, सिने अभिनेत्री माधुरी पवार, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, नाना नाकाडे, लीलाधर भरडकर, डॅा.सोनल कोवे, संजय साळवे, युनूस शेख, रिंकू पापडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नेते व नागरिक उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थी संघाला मोठे खिंडार

या सभेत आदिवासी विद्यार्थी संघाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सरपंच, पंचायत समिती सभापती, सदस्य यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाला मोठे खिंडार पडले आहे. प्रवेश केलेल्यांमध्ये सिरोंचाचे अविसंचे नेते बानय्या जंगम, सरसेनापती नंदू नरोटे, भटेगावचे उपसरपंच ज्येष्ठ नेते मोहन पुराम, मदन वट्टी, दौलत कुमोटी, ऋषी हलामी, बाबुराव मडावी, शालिक मडावी, सरिता वट्टी, देवनाथ पारसे, राजू आत्राम, सुमन नैताम, दिलीप नैताम, रेश्मा काटेंगे, बाबुराव कुळसंगे यांच्यासह उत्तर आणि दक्षिण गडचिरोलीतील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.