गडचिरोली : गेल्या 43 वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. पूर्वी पक्षाला उमेदवार मिळत नव्हते, आता पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी धडपड सुरू असते. पण या वाटचालीत अलिकडे सुरू झालेली गटबाजी हाणीकारक आहे, असे सांगत भाजपचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी थेट निवडणूक प्रभारी असलेले चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांनाच हटविण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वीकृत नगरसेवक सुधाकर येनगंधलवार यांचे ज्येष्ठ बंधू गजानन येनगंधलवार हेसुद्धा उपस्थित होते.
यावेळी रमेश भुरसे म्हणाले, मी प्रभाग क्र.5 मधून उमेदवारी मागितली होती. त्यावेळी माजी खा.अशोक नेते, आ.मिलिंद नरोटे, मा.आ.डॅा.नामदेव उसेंडी, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे आदींनी निवडणूक लढण्यास थांबवून मला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात ते आश्वासन कोणीच पाळले नाही. निवडणूक प्रभारींपुढे कोणाचे काही चाललेच नाही.
वास्तविक भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाला संधी द्यायची हे आधीच ठरलेले होते. त्यामुळे संबंधित उमेदवार त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करू शकले. मी सकाळी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपच्या गटनेत्यांनी नामांकन भरण्यासाठी असलेल्या मुदतीच्या जेमतेम अर्धा तास आधी मला फॅार्म भरण्यास सांगितले. त्यामुळे आधी दाखल करणाऱ्यांचे अर्ज मंजूर होऊन माझा अर्ज बाद झाला. केवळ औपचारिकता म्हणून मला फॅार्म भरण्यास सांगितले, प्रत्यक्षात मात्र मला स्वीकृत सदस्य बनवायचेच नव्हते, असे भुरसे म्हणाले.
आ.बंटी भांगडिया यांना गडचिरोली जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केल्यापासून मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू झाली आहे. बंटीभाऊ गॅाडफादर असल्यामुळे आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही, अशी भावना काही लोकांची झाली आहे. त्यामुळे आ.भांगडिया यांना या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी भुरसे यांनी केली. तसेच जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांच्यावरही त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
नगर परिषदेत भाजपचा गटनेता निवडताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. कोणतीही बैठक, चर्चा झाली नाही. ज्यांनी पक्षवाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांना डावलले जात असल्याचे भुरसे म्हणाले. बहुजन समाजाला भाजपसोब जोडण्याचे काम मी, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे यांनी केले. यापूर्वी भाजपचे 21 नगरसेवक होते, ते यावेळी 15 वर आले. तरीही कोणी विजयाचे शिल्पकार म्हणून श्रेय घेतात. वास्तविक विजय एक-दोघांचा नाही. कार्यकर्त्यांचा विजय असतो, असे भुरसे म्हणाले.
यावेळी गजानन येनगंधलवार यांनीही भुरसे यांच्याप्रमाणे जुन्या लोकांना डावलले जात असल्याचा आरोप केला. मी एवढ्या वर्षांपासून पक्षात एकनिष्ठेने काम करत असताना मला संधी दिली नाही, असा सूर त्यांनी आळवला.
































