Home राजकीय घडामोडी काँग्रेस करणार सेमाना देवस्थानात 108 वेळा हनुमान चालिसा पठण

काँग्रेस करणार सेमाना देवस्थानात 108 वेळा हनुमान चालिसा पठण

'देवाभाऊ' पावण्यासाठी साकडे

पत्रपरिषदेत माहिती देताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह इतर पदाधिकारी

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत आहे, मात्र मुख्यमंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील समस्या दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण करून हनुमानाला साकडे घातले जाणार आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

जिल्ह्यातील समस्यांचे तातडीने निराकरण होऊन जिल्ह्यावर आलेले संकट संपुष्टात यावे, तसेच नागरिकांना सुरक्षित जीवन मिळावे, यासाठी येत्या मंगळवार, दि.24 मार्च रोजी 108 हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन शहरातील प्रसिद्ध सेमाना देवस्थानात केले जाणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

अशा आहेत मुख्य मागण्या :
1) दिवसेंदिवस जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे; ते रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्या. 2) शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबवावा. 3) शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक रानटी हत्ती व इतर वन्य प्राण्यांकडून पूर्णतः उद्ध्वस्त केले जात आहे, त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. 4) जिल्ह्यातील रस्त्यांची व आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे, पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची व आरोग्य व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात यावी. 5) आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावे. 6) लोकांच्या हाताला पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे, स्थानिक सुरजागड-कोनसरी प्रकल्पात व इतर कोणत्याही नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना 80 टक्के जागा देण्यात याव्या. 7) जिल्ह्यातील बहुसंख्य दवाखाने, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून त्यामुळे जनतेच्या अनेक समस्या प्रलंबित असतात. सदर रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी. 8) लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळत नाही, नियमित वीज पुरवठा करण्यात यावा. 9) जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे वनपट्ट्यांचे दावे प्रलंबित असून तातडीने ते निकाली काढण्यात यावे. (अधिक बातमी खाली वाचा)

वरील समस्या दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक व काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. (अधिक बातमी खाली वाचा)

पत्रकार परिषदेला खा.डॅा.किरसान यांचे पुत्र अॅड.दुष्यंत किरसान, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोडकर, नगरसेवक सतीश विधाते, चौधरी, रजनिकांत मोटघरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.