गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये काँग्रेस पक्षातील ईच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. त्या सर्वांच्या मुलाखती 5 ऑक्टोबर रोजी येथील शासकीय विश्राम भवनात होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदार संघासाठी अवघ्या एका तासाची वेळ ठरविण्यात आली.
आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती यावेळी घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक आमदार अभिजीत वंजारी, खासदार डॉ.एन.डी. किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे उमेदवारांच्या मुलाखती घेतील. त्यात सकाळी 11 ते 12 वाजतादरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्र, दुपारी 12 ते 1 दरम्यान आरमोरी आणि दुपारी 1 ते 2 अहेरी क्षेत्राच्या मुलाखती पार पडतील, असे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी कळविले.
या मुलाखतींचा अहवाल प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारींकडे जाईल. नंतर दिल्लीतील हायकमांडच्या मंजुरीने उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. त्यामुळे परीक्षा गडचिरोलीत होत असली तरी निकाल मुंबईत जाहीर केला जाणार आहे.