गडचिरोली : जिल्ह्याचा उत्तर भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आरमोरी विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा भाजपने विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदार संघात हॅटट्रिक करून नवीन रेकॅार्ड बनविण्यासाठी आ.गजबे यांची जोमाने तयारी सुरू आहे. दुसरीकडे गजबे यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीत यावेळी ईच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. काँग्रेसचे अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना शिवसेनेने (उबाठा) या मतदार संघावर दावा केला आहे. हा पेच सुटल्यानंतरच महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
2014 आणि 2019 अशा दोन निवडणुकांमध्ये आ.कृष्णा गजबे यांनी भाजपच्या तिकिटवर विजय मिळवला आहे. यावेळी तिसऱ्यांदा ते विजय मिळवतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. वास्तविक या मतदार संघात सलग तीन वेळा निवडून येणे आजपर्यंत कोणालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे आ.गजबे यात यशस्वी झाल्यास त्यांच्या नावावर एक रेकॅार्ड तयार होणार आहे. राज्य सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचे पाठबळ असल्यामुळे गजबे हे तिकीटच्या बाबतीत निर्धास्त होते. मात्र आता जनतेच्या दरबारात जाताना त्यांना स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करावे लागणार आहे.
साधी राहणी, मृदू स्वभाव आणि नम्रपणा हे त्यांच्यातील गुण सर्वसामान्यांना भावतात. लोकसभा निवडणुकीत मतदार संघातील वीज पुरवठ्यासारखे काही मुद्दे विरोधकांनी उचलून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता त्यावर बऱ्यापैकी मात करण्यात ते यशस्वी झाले आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य गजबे यांच्यासाठी थोडा चिंतेचा आणि महाविकास आघाडीचा उत्साह वाढविणारा मुद्दा झाला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरू ईच्छिणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
या मतदार संघात पूर्वी शिवसेनेचे प्राबल्य होते. पण अलिकडच्या काही वर्षात सुरेंद्र चंदेल यांचा अपवाद वगळल्यास या मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी फारसे सक्रिय नसल्यामुळे शिवसेना काहीशी बॅकफुटवर गेली आहे. त्यातच चंदेल हे जात वैधता प्रमाणपत्रामुळे अडचणीत सापडले आहे. असे असतानाही शिवसेनेने कोणत्या संभाव्य उमेदवाराला नजरेसमोर ठेवून या मतदार संघावर दावा केला, याबाबत चर्चा रंगत आहे. काँग्रेसकडून लढू इच्छिणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याइतपत हिंमत कोणातही दिसत नाही. अशा स्थितीत ही जागा शिवसेना आपल्याकडे खेचते की काँग्रेस पुन्हा एकदा आपल्या उमेदवारावर डाव लावले, हे येत्या दोन ते तीन दिवसात स्पष्ट होऊ शकेल.