गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य आणि महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी शनिवार, 6 एप्रिल रोजी भव्य प्रचारसभा, तसेच महायुतीचा महिला मेळावा देवरीच्या छत्रपती शिवाजी संकुलात आयोजित केला होता. ना.धर्मरावबाबा आत्राम, महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात महिलांच्या सन्मानासाठी भाजप सरकारने राबविलेल्या योजनांचा उहापोह करण्यात आला.
यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महिलांना मोठा सन्मान मिळाला आहे. महिला सशक्तीकरण, तीन तलाक, नारी शक्ती वंदन अधिनियम, मातृवंदना, सौभाग्यवती, सुकन्या योजना, महिला प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना अशा अनेक योजना महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित जीवनासाठी कार्यान्वित करण्यात आल्या. महिलांच्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33 टक्के करून महिलांचा सन्मान केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांचा सन्मान करणाऱ्या सरकारला पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी येत्या १९ एप्रिलला भाजपला कौल देऊन महायुतीला विजयी करावा, अशी विनंती यावेळी खा.नेते यांनी मेळाव्याला उपस्थित महिलावर्गाला केली.
पालकमंत्री म्हणून विकासकामे मार्गी लावली- ना.आत्राम
गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले, महायुतीच्या नेतृत्वातील राज्य शासनसुद्धा महिलांच्या सन्मानासाठी कटीबद्ध आहे. लेक लाडकी ही योजना अतिशय चांगली योजना आहे. याचा अनेकांना फायदा होत आहे. महिला सशक्तिकरण व मेळावे सुद्धा शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी आयोजित केले गेले. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सहा पुलांचे उद्घाटन केले आहे. याचबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते सुद्धा सोडवले आहेत. महायुतीच्या सरकारचा दृष्टिकोन विकासात्मक आहे. त्यामुळे या सरकारला संधी दिल्यास आणखी कामे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंचावर प्रामुख्याने महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष अॅड.येशूलाल उपराडे, संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, प्रदेश उपाध्यक्ष शालिनी डोंगरे, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स.सभापती अंबिका बंजार, नगराध्यक्ष संजय उईके, तालुकाध्यक्ष प्रवीण दहीकर, जेष्ठ नेते तथा कृषी ऊबास सभापती प्रमोद संगीडवार, उपनगराध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण तसेच मेळाव्याला महायुतीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.