न.प.च्या निवडणूक रिंगणातून 2 दिवसात एकाचीही माघार नाही

आज शेवटचा दिवस, बंडखोरांवर लक्ष

गडचिरोली : गडचिरोलीसह देसाईगंज आणि आरमोरी या तीनही नगर परिषदांमध्ये निवडणुकीच्या रिंगणातून नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी नामांकन वैध ठरलेल्या कोणीही दिवसात माघार घेतलेली नाही. आज (दि.21) माघार घेण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. अशा स्थितीत अपक्ष अर्ज भरून तो अर्ज पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण माघार घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

गडचिरोली नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी 8 जणांचे, तर नगरसेवक पदासाठी 13 प्रभागांमधून 134 अर्ज वैध ठरले आहेत. देसाईगंजमध्ये नगराध्यक्षदाचे 9, तर नगरसेवक पदाचे 131 अर्ज वैध ठरले आहेत. तसेच आरमोरीत नगराध्यक्षपदाचे 11 आणि नगरसेवकपदाचे 118 अर्ज वैध ठरले आहेत.

यात काही अपक्ष आणि काही पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नामांकन दाखल करणाऱ्या बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे. गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी नगसेवक पदासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन भरण्यासोबत नगराध्यक्षपदासाठी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे त्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कायम राहतात की माघार घेतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. देसाईगंज नगर परिषदेतही माजी नगराध्यक्ष शालू दंडवते माघार घेणार की भाजपच्या बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.