अहेरी उपविभागातील नागरिकांच्या जीवनमानात बदल होत आहे- आत्राम

71 वर्षांचा जनयोद्धा तुमच्यासाठी मैदानात

मुलचेरा : माझ्या अहेरी उपविभागातील क्षेत्रातील लोक पूर्वी कसे राहात होते आणि आज कसे राहतात यातील फरक लक्षात घ्या. शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत मिळणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ असो, की रोजगाराची वाढलेली साधने असो, यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावत आहे. त्यामुळे विकासाची दृष्टी असणारा आणि सातत्याने कार्यरत राहणारा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडला पाहिजे. झोपा काढणारा नाही, असा टोला महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांनी लगावला.

मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ना.आत्राम म्हणाले, शासनाच्या लाडकी बहिण योजना, मोफत सिलिंडर योजना, युवकांना कौशल्य विकासासोबत त्यांच्या हाताला काम आणि दाम देणाऱ्या योजना असो की शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या कृषी विभागाच्या योजना असो, यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना मिळाल्या नव्हत्या. आता लवकरच या उपविभागात रोजगाराची साधनं आणखी वाढणार आहेत. पण साडेचार वर्ष झोपा काढणाऱ्या आणि सहा महिने भुलथापा देत फिरणाऱ्यारांना पुन्हा झोपायला पाठवा. कोणाच्याही लबाडी आणि भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

आज मी 71 वर्षाचा असूनही जनयोद्धा बनून तुमच्या कल्याणासाठी, आपल्या लोकांसाठी मैदानात आहे. तुमचे प्रेम आणि साथ यावेळीही द्या, अशी विनंती यावेळी धर्मरावबाबांनी केली.