गडचिरोली : गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करत महायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांनी नामांकन दाखल केले. यावेळी आ.परिणय फुके, माजी खा.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे राजू कावळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
माजी खा.अशोक नेते यांच्या चामोर्शी मार्गावरील कार्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीतील खुल्या वाहनावर उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी विराजमान होते. रॅलीत प्रामुख्याने रमेश भुरसे, रविंद्र ओल्लालवार, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, डॅा.चंदा कोडवते, रमेश बारसागडे, गोविंद सारडा, अनिल पोहकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गोवर्धन चव्हाण, सुधाकर पेटकर, आकोली बिश्वास, प्रतिमा सरकार, परिमल सरकार, ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
ही रॅली एसडीओ कार्यालयावर पोहोचल्यानंतर तिथे नामांकन दाखल करण्यात आले. यानंतर शिवाजी महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या गंगूवार मैदानावर निर्धार मेळावा घेण्यात आला. यावेळी आ.परिणय फुके यांनी सर्वसामान्य जनतेचा कौल डॅा.नरोटे यांच्या बाजुने असल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आल्याचे स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले धडाडीचे निर्णय, लाडकी बहिणसारख्या कल्याणकारी योजनांमुळे महायुतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा संकल्प या मेळाव्यातून करूया असे आवाहन यावेळी विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक माजी खासदार अशोक नेते यांनी केले. या विधानसभा क्षेत्रात आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख करत त्यांनी डॅा.नरोटे हे उर्वरित कामांना गती देतील, असा विश्वास व्यक्त केला.
शेतकरी, शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नावर भर देणार-डॅा.नरोटे
उमेदवार डॅा.नरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर भाजपने जो विश्वास दाखविला तो सार्थ करून दाखवेन, असे सांगितले. या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या, युवक वर्गाच्या, शिक्षण आणि आरोग्याच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. अशोक नेते यांनी मेडीकल कॅालेज आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता त्यात विविध सुविधा देण्यावर माझा भर राहील, असे त्यांनी सांगितले.