गडचिरोली : राज्यात बहुजनांसोबत संवाद साधण्यासाठी मंडल यात्रा काढली असून मंडल यात्रेचा हा वसा घेऊन सर्व कानाकोपऱ्यात जनजागृती केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राज राजपुरकर यांनी येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक विश्रामगृहात आयोजित या पत्रकार परिषदेला राकाँ (शप)चे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश सरचिटणीस ॲड.संजय ठाकरे, विजय गोरडवार, शेमदेव चापले, नईन शेख, हुसेन शेख, वसंत गोंगल, सदाशिव भांडेकर, चंद्रकांत शिवणकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष राज राजपूरकर यांनी सांगितले की, 9 ऑगस्टला क्रांतिदिनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून नागपुरात मंडल यात्रेचा शुभारंभ केला होता. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात शेतकरी, महिला यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तसेच संपूर्ण दौऱ्यात ओबीसी बांधवांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रत देऊन सन्मान केला जाईल. ही यात्रा सन्मानाची व स्वाभिमानाची असून नागपूरपासून चंद्रपूरमार्गे गडचिरोलीत आली आहे. देशात व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना मंडल आयोग लागू केला होता. या आयोगाला भाजपाकडून विरोध झाला होता. राज्यात सर्वप्रथम ओबीसी आरक्षणाची भूमिका त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्या पक्षाने घेतल्यामुळे ओबीसीला आरक्षण मिळाले होते. त्यामुळे ‘एक राखी मंडल के लिये’ बांधून मंडल यात्रेचा सन्मान केला जात आहे.
मंडल आयोगाचा विरोध म्हणून कमंडल यात्रा काढली. यामागे भाजपा होती. बहुजनांसाठी लढ्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. हे सरकार ओबीसीविरुद्ध असून जे मंडल यात्रेला बंडल यात्रा म्हणत आहे, ते बहुजनांच्या पाठिशी उभेच राहू शकत नाही. कितीही विरोध झाला तरी आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवून जिल्ह्यात रोजगार वाढला पाहिजे, शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला देऊन उद्योजकांनी जमीन विकत घ्यावी, जिल्ह्यात कारखाने उभे राहावे, ही पक्षाची भूमिका असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी सांगितले.