गडचिरोली : मणिपूरमधील आदिवासी महिलांवरील अमानवीय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने इंदिरा गांधी चौक ते कारगिल चौकापर्यंत लाँग मार्च काढून इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी मणिपूर राज्यातील हिंसाचाराच्या घटनेला तेथील राज्य व केंद्रातील बीजेपी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला.
मणिपूर राज्यात कुकी आदिवासी महिलांची विडंबना करून व त्यांची नग्न धिंड काढणे, अत्याचार करून ठार मारणे, हे मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तेथील मैतेयी समुदायाने केले असताना त्याची दखल उशिरा घेण्यात आली. सदर महिलांनी हिंसाचारापासून स्वतःला वाचविण्यासाठी पोलिसांना संरक्षण मागितले, परंतु पोलिसांनीच या महिलांना गुन्हेगारांच्या हवाली केल्याचे सांगण्यात येते. यावरून जातीवाद, वंशवाद व धर्माच्या नावावर पुरस्कृत हा हिंसाचार असल्याचे दिसून येते, असे डॅा.किरसान म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून तंबी दिल्यानंतर सरकारने फक्त चार नराधम गुन्हेगारांना अटक केली. अशा लज्जास्पद घटनेनंतरही मणिपूरचे मुख्यमंत्री त्याकडे गांभीर्याने बघत नाही. ही घटना घडून दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असताना प्रधानमंत्री व गृहमंत्री यांनी याप्रकरणी तसेच मणिपूर राज्यात घडत असलेल्या हिंसेची दखल घेतली नाही, ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. या घटनेतील सहभागी सर्व नराधमांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निषेध सभेच्या शेवटी स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.