जि.प.मधील आरक्षणाने अनेक दिग्गजांना बदलावा लागणार गट

कुठे-कुठे घमासान होणार? वाचा

गडचिरोली : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या राजकारणात तीन वर्षाच्या ‘प्रशासनराज’नंतर पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. पण सोमवारी (दि.13) काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर काही दिग्गजांचा स्वप्नभंग झाला, तर काहींना ‘झेडपी’मधील प्रवेशासाठी दुसऱ्या गटातून निवडणूक लढण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांच्या उपस्थितीत लहान मुलींच्या हातून चिठ्ठी काढून जिल्हा परिषदेच्या 51 गटांसह आणि पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) हेमंत मोहरे, सहायक महसूल अधिकारी प्रशांत चिटमलवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तथा ईच्छुक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक दिग्गजांची झाली अडचण

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांचा कुनघाडा रै.- तळोधी मो. गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना नामाप्र साठी राखीव मतदार संघातून उमेदवारी दाखल करावी लागेल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे कोटगल-मुरखळा गटातून लढण्यासाठी ईच्छुक असताना हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांना जेप्रा-विहीरगाव किंवा इतर गटातून रिंगणात उतरावे लागेल. माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा वेलगूर-आलापल्ली मतदार संघ खुल्या प्रवर्गासाठी असल्याने त्यांना अडचण नाही. माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांचा लखमापूर बोरी हा ओबीसी प्रवर्गासाठी गेल्याने त्यांना खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या मतदार संघातून उमेदवारी दाखल करावी लागेल. माजी सभापती नाना नाकाडे यांचा विरोरा-सावंगी हा गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांचा येरकड-रांगी आता एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यामुळे त्यांना चातगाव जि.प.क्षेत्रातून नशिब आजमावावे लागेल. माजी सदस्य अॅड.राम मेश्राम यांचा येवली-मुडझा गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी गेला. त्यामुळे त्यांनाही गट बदलवावा लागेल.

कुठे-कुठे होऊ शकते घमासान?

आरक्षणामुळे अनेकांना आपला जुना गट सोडावा लागत असल्यामुळे जिल्ह्यातील काही मोजक्या गटांमध्ये प्रमुख दिग्गज नामांकन दाखल करतील. त्यामुळे त्या ठिकाणी चांगलेच घमासान होण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी आणि जेप्रा-विहिरगाव या नामाप्र साठी राखीव गटांमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, युवक काँग्रेसचे अतुल मल्लेलवार यांच्यापैकी कोणी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील लढत चुरशीची होऊ शकते.

चामोर्शी तालुक्यातील आष्टी-इल्लूर या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव मतदार संघातही दिग्गजांची गर्दी होईल. त्यात माजी सभापती आणि राष्ट्रवादी (शप)चे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, भाजपकडून संजय पंदीलवार आणि शिवसेनेकडून (शिंदे) जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे हे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-आसरअल्ली या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव गटातही इच्छुकांना संधी असल्यामुळे या ठिकाणी माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते ऋतुराज हलगेकर हे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे माजी जि.प.अध्यक्ष आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभा निवडणूक वडीलांविरूद्ध लढल्यानंतर आता त्या जिल्हा परिषदेच्या राजकारणात जाण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.