स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादीची (एपी) मोर्चेबांधणी

सिरोंचात अनेकांचा पक्षप्रवेश

सिरोंचा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कंबर कसली आहे. माजी मंत्री आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सिरोंचा दौऱ्यादरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. धर्मरावबाबांनी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले.

सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा, मादाराम, विठ्ठलरावपेठा, मोयाबिनपेठा, बेज्जुरपल्ली, बामणी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षप्रवेश केला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सिरोंचा तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम बनत आहे.

यावेळी पक्षाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोलूरी, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, सत्यनारायण परपटला, सत्यम पिडगू आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.