एटापल्ली : अनुभवी आणि सक्रिय नेतृत्व असेल तर मतदार संघाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे विकासाला चालना देण्यासाठी खंबीर व सक्षम नेतृत्वालाच निवडून द्या, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. एटापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) बुथ कमिटीच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) आणि इतर पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी धर्मरावबाबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे यांच्यासह एटापल्ली पंचायत समितीच्या माजी सभापती बेबी लेकामी, एटापल्ली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, माजी जि.प.सदस्य संजय चरडूके, सपना कोडापे, मनीष दुर्गे, पक्षाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी, भामरागड तालुकाध्यक्ष रमेश रामगोनवार, मनीष दुर्गे, लक्ष्मण नरोटे, सांबाजी हिचामी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, महायुती सरकार लोकाभिमुख व लोकहितार्थ निर्णय घेणारे आहे. मुख्यतः राज्यात लाडकी बहीण ही अभिनव योजना अंमलात आणून महिला भगिनींचे सक्षमीकरण करण्याचे मिशन हाती घेतले. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून अन्य उमेदवारांमध्ये अनुभवाचा आणि सक्रियतेचा अभाव आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच कौल देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे “घडी” चिन्ह असलेले दुपट्टे गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चेरडूके यांनी तर संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले, शंकर मेश्राम यांनी आभार मानले.
एटापल्ली येथे ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे आगमन होताच आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा व रितीरिवाजानुसार ढोलताशांनी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी धर्मरावबाबांच्या जयघोषाने एटापल्ली नगरी दुमदुमून गेली होती.