गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक माजी खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. गडचिरोली विधानसभेच्या या विस्तृत बैठकीत विस्तारक, बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख सहभागी झाले होते.
यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, तसेच प्रदेशाच्या विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक अशोक नेते, मध्यप्रदेशचे युवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.निशांत खरे, अनु.जनजाती मोर्चाचे महाराष्ट्र संघटक किशोर काळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, मध्यप्रदेशचे पंकज टेकाम, जेष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, लोकसभा विस्तारक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महाराष्ट्र एस.टी.मोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख अक्षय उईके, तसेच विस्तारक व मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीच्या समारोपीय मार्गदर्शनात माजी खासदार अशोक नेते म्हणाले, केंद्र व राज्य सरकार दीन-दलित, शोषित, पिडीत, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उत्थानासाठी अनेक योजना आणल्या. महिला सक्षमीकरणासाठी हे सरकार सदैव कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना भाजपशासित मध्यप्रदेशमध्ये सुरूवातीपासूनच सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने देखील ही योजना लागू केल्यानंतर अल्पावधीत जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ मिळाला यासाठी आपण गडचिरोली, चामोर्शी आणि धानोरा येथे योजनेचे मोफत अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी अनेक महिला भगिनींना लाभ मिळाल्याचे समाधान वाटते. सरकारची कामे, योजनांच्या माध्यमातून मतदारांना हे सरकार कसे तुमच्या हिताचे आहे हे पटवून द्या, अशी सूचना नेते यांनी केली.
उमेदवाराच्या विजयाचा शिल्पकार हा बुथ प्रमुखच असतो. भाजपचा विजयी संकल्प करण्यासाठी विस्तारक, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळ न दवडता आपले कर्तव्य निटपणे पार पाडावे, अशी सूचना अशोक नेते यांनी केली.
या बैठकीत मध्यप्रदेश युवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॅा.निशांत खरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांवर विस्तृत मार्गदर्शन करत विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचा शंखनाद करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.