गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्हा आढावा बैठक मंगळवारी शासकीय विश्रामगृहातील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पक्षाचे संघटन अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि तळागाळाशी घट्ट जोडणारे करण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रारंभी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व.अजित पवार यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अल्पसंख्यांक, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. त्यांच्या पुरोगामी विचारसरणीला आणि सर्वसमावेशक नेतृत्वाला पुढे नेण्याचा सामूहिक संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना व्यक्त झाली.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्याच्या विकासाला नवी ऊर्जा आणि गती मिळत आहे. आपण सर्वांनी एकजुटीने त्यांच्या नेतृत्वाला बळ देत संघटन अधिक गतिमान व प्रभावी करू, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीदरम्यान आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक बुथस्तरावर संघटन मजबुतीकरण, अल्पसंख्यांक समाजातील युवकांना पक्षाशी सक्रियपणे जोडणे, स्थानिक प्रश्नांवर ठोस पाठपुरावा करणे आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचविणे यावर विशेष भर देण्यात आला.
याप्रसंगी पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद युनूस शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, गडचिरोली शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव मुश्ताक शेख, जिल्हाध्यक्ष नजमुद्दीन शेख, जिल्हा कार्याध्यक्ष अनिस शेख यांच्यासह न.प. सदस्य, जि.प. आणि पं.स.चे माजी सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































