माझ्याविरूद्ध खोट्या सह्यांची मोहीम, आ.डॅा.देवराव होळी यांचा आरोप

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

गडचिरोली : दोन टर्मपासून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत असलेले भाजपचे आमदार डॅा.देवराव होळी हॅटट्रिक साधण्याची ईच्छा ठेवून तयारी करत असताना त्यांच्यापुढे पक्षांतर्गत विरोधकांनी आव्हान उभे केले आहे. आपल्याला तिकीट मिळू नये आणि दुसऱ्या कोणाला तिकीट मिळावे असे दुहेरी उद्देश ठेवून खोट्या सह्यांची मोहीम सुरू आहे. जर या पद्धतीने तिकीट वाटप झाले तर लोकसभेप्रमाणे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी यांनी दिला आहे.

प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॅा.होळी म्हणाले, लोकांकडून दुसऱ्याच कारणासाठी सही हवी असे सांगून लोकांच्या सह्या घेतल्या जात आहेत. या पद्धतीने खोट्या सह्या घेऊन पक्षाची आणि लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहावे आणि सह्यासाठी कोणी आल्यास त्याला विरोध करावा, असे आवाहन आ.डॅा.होळी यांनी केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाच प्रकारे खोट्या सह्यांची मोहीम राबवून आपल्याच पक्षाची फसवणूक जिल्ह्यातील पक्षाच्या काही लोकांनी केली होती. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. आता पुन्हा मूळ भाजपविरोधी मानसिकता असलेल्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तशीच रणनिती तयार केली असल्याचा आरोप डॅा.होळी यांनी केला.

कोणाला तिकीट द्यायची हे पक्ष ठरवेल, पण अशा पद्धतीने लॅाबिंग केल्यास लोकसभेप्रमाणे परिणाम दिसेल, असे डॅा.होळी म्हणाले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. पत्रपरिषदेला भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद पिपरे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र ओल्लालवार उपस्थित होते.