डॅा.होळींचे ठरले, अपक्षच लढणार ! समर्थकांच्या मेळाव्यात केले सुतोवाच

षडयंत्र करत तिकीट कापल्याचा आरोप

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघातून भाजपचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदार डॅा.देवराव होळी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसे सुतोवाच त्यांनी सोमवारी समर्थकांच्या मेळाव्यात आणि नंतर पत्रकार परिषदेत केले. आज ते अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मला पक्षाने निवडणूक लढण्याची तयारी करण्यास सांगून वेळेवर माझे तिकीट कापले. हा माझ्यासह माझ्या मतदारांचा अपमान आहे. माझ्याविरूद्ध षडयंत्र करत तिकीट कापण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. मला मोठे होऊ द्यायचे नव्हते म्हणून माझे तिकीट कापले, असाही आरोप त्यांनी माजी खासदार अशोक नेते यांच्यावर लावला.

शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी मुंबईला जाऊन पक्षाने आपला निर्णय फिरवून मलाच तिकीट द्यावी, अशी विनंती केली. पण त्यात यश न आल्याने काल मुंबईवरून परत येताच समर्थकांनी डॅा.होळी यांच्या कार्यालयाबाहेर मेळावा घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे (शिंदे) सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे लौकिक भिवापुरे, विवेक ब्राह्मणवाडे, पं.स.चे माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे, भाजपच्या प्रतिभा चौधरी, कविता उरकुडे, सुरेश शहा आदी उपस्थित होते.