कुरखेडा : आरमोरी मतदार संघात प्रचाराच्या रणधुमाळीने आता वेग पकडला आहे. विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक मारण्याचा संकल्प करत ग्रामीण भागात दौरे सुरू केले. रविवारी सकाळी येरकडी गावापासून गावभेटींना सुरूवात करण्यात आली. ठिकठिकाणी गावकऱ्यांकडून झालेले स्वागत आणि कार्यकर्त्यांमधील उत्साहाने आ.गजबे भारावून गेले होते.
रविवारी येरकडी, मरारटोला, अंतरगाव, खेडेगाव, पलसगड, चारभट्टी, धानोरी, साधुटोला, तळेगाव, चिखली, वडेगाव असा प्रचारदौरा करण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील येरकडी गावात 10 नोव्हेंबर रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येरकडी येथील कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी मिळून या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, माजी जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम, हरिदास कुंजाम, बालकदास नंदेश्वर, निलकंठ गावळे, केशव गुरुनुले आणि अन्य कार्यकर्ते व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार गजबे यांनी या बैठकीत गावकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी गावातील समस्यांची माहिती घेतली आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपला पाठिंबा दर्शवला. येरकडीच्या गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि पाय धुऊन आ.गजबे यांचे स्वागत केले. हे पाहून कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह आणि उर्जा निर्माण झाली.
गावातील वृद्ध, तरुण आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी गजबे यांचे औक्षण करून कृष्णाभाऊंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिला.