गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीची हवा वाहू लागल्यानंतर युवा वर्गही राजकारणात रस घेऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वी कंत्राटदार सागर अरुण निंबोरकर यांनी अनेक युवा कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी पुन्हा युवकांचा पक्षप्रवेश सोहळा झाला. आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्यकक्ष या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात हा पक्षप्रवेश झाला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तु सुत्रपवार, प्रा.सतीश चिचघरे, अनिल करपे, आकाश गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशासाठी शहरातील शुभम बाळेकरमकर, रवी कांबळे, विजय बारापात्रे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि महिला भगिनींनी पुढाकार घेतला. भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा स्विकारत “विकासाच्या प्रवासात सहभागी होऊ” अशा घोषणा त्यांनी दिल्या.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्याचे तुम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते आहात ही मानसन्मानाची बाब आहे. मोदीजी आणि फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भरतेकडे झेपावत आहे. भाजप कार्यकर्ता असणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक सन्मानाची बाब आहे.”
भाजपाच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवून नव्या ऊर्जेने पक्षात दाखल झालेल्या तरुणांच्या या लाटेमुळे गडचिरोलीत राजकीय जनजागृतीचा आणि विकासाच्या प्रवासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
































