चित्रपटातून उलगडणार धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनपट, शुक्रवारी होणार प्रदर्शित

‘धर्मरावबाबा... दिलों के राजा’ची चर्चा

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे अहेरीच्या राजघराण्यातील असले तरी त्यांचे जीवन एक संघर्षपूर्ण कहाणी आहे. हा जिल्हा त्यांच्या 40 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा साक्षीदार आहे. त्यांचा जीवनपट मांडणारा ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों के राजा’ या चित्रपटाची निर्मिती इबिना इंटरटेन्मेंटने केली आहे. अहेरीत 7 जून 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांचे बालपण, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे जीवनमान उंचलण्यासाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यांच्या नक्षल अपहरणाचा थरार, लोहखनिज प्रकल्पातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात उद्योगाची नवी पहाट, त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास या चित्रपटातून उलगडल्या जाणार आहे.

‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों के राजा’ या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लाँच झाला. वयाच्या 14 व्या वर्षी वडीलांचे छत्र हरपल्यानंतरचा त्यांचा संघर्ष, ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांचे केलेले अपहरण. हा खडतर व कठीण काळ धर्मरावबाबा यांनी बघितला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाबा म्हणतात “जेव्हा नक्षलवादी माझं अपहरण करण्यासाठी आलेत, तेव्हा माझ्यासोबत अनेक लोक होती. पण मी सर्वांना सांगितलं की हा संघर्ष माझ्या एकट्याचा आहे. जे होईल ते बघू. पण तुम्ही सुखरूप घरी जा.” असा नेता परत होणे नाही. धर्मरावबाबा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हेच मोजके क्षण येतात, पण याव्यतिरिक्त या चित्रपटात त्यांनी केलेली अनेक जनहिताची कामे दाखवण्यात आली आहेत.

गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण आता हा जिल्हा प्रगतीच्या वाटेवर आहे. इथे कधीकाळी ना उत्पन्नाचे साधन होते, ना व्यवसायाचे काही मार्ग. हा एक असा जिल्हा जेथे गुंतवणूकदार तर नाहीच, पण सरकारसुद्धा लक्ष देत नव्हते. पण काळ बदलला, आज गडचिरोली जिल्ह्यात सुरजागडसारखे खनिज प्रकल्प आणले आहेत. एक काळ होता जेव्हा येथील स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन म्हणून फक्त तेंदूपत्ता तोडणे हेच एकमेव होते. पूर्वी एका आदिवासी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न केवळ 15000 रुपये होते. आज तेच कामगार सुरजागडसारख्या प्रकल्पात जेव्हा काम करत आहेत तर त्यांना 15000 रूपये मासिक उत्पन्न मिळत आहे.

‘नॉन इंडस्ट्रियल लँड’ होत आहे मायनिंग हब

‘नॉन इंडस्ट्रियल लँड’ म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज इंडस्ट्रियल लँड म्हणून उदयास येऊन मायनिंग हब होत आहे. इथे अनेक उद्योगपती गुंतवणूक करताहेत. हा कायापालट बाबांनी केला. यासोबतच राज्यातील अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले. अनुदानित आदिवासी आश्रमशाळा ही संकल्पनाच त्यांची होती. आज संपुर्ण राज्यात याच संकल्पनेमुळे अनेक आदिवासी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, सीए व अनेक अशा बड्या पदावर कार्यरत आहेत.

मागासवर्गीय जनतेसाठी अनुदानित शाळा व उद्योगासाठी राईस मिल, नवीन तालुक्याची निर्मिती, प्रशस्त शासकीय रुग्णालय, स्वतंत्र ॲाक्सिजन निर्मिती प्लान्टस्, चांगले रस्ते, वीज, ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका, गोंडवाना सैनिकी विद्यालय, १०० बेड्सचे नवीन रुग्णालय, अशा अनेक योजनांमुळे आदिवासींच्या जीवनात नवी विकासाची पहाट आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता आपल्या आदिवासींसाठी आयुष्य खर्ची घालणारा हा नेता आजही आदिवासींच्या मनात घर करुन बसला आहे.