राज्यातील युती सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे- खा.अशोक नेते

हेक्‍टरी २० हजारांची मदत मिळणार

गडचिरोली : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक निर्गमित केले असून या विधेयकानुसार महाराष्ट्रातील खरीप पिक घेतलेल्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. चालू पणन हंगामात राज्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, धान उत्पादनाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला होता. त्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत हेक्टरी २० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला. यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहे, हे सिद्ध होत असल्याचे खा.अशोक नेते म्हणाले.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना खा.नेते यांनी या अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत केले. शेतकऱ्यांच्या समस्या मी सरकारदरबारी मांडल्या होत्या. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील आधारभूत किमतीनुसार धान खरेदीची मर्यादा प्रतिएकर ९ क्विंटल ऐवजी १५ क्विंटल करावी यासह धान खरेदीची नोंदणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यासंबंधी आणि तसेच शेतकऱ्यांना सरसकट बोनस जाहीर करण्यासंदर्भात शासनस्तरावर अनेक वेळा पाठपुरावा केला. शेवटी महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर करून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे. त्यामुळे या निर्णयाचे मी मनापासून स्वागत आणि सरकारचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.