गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवार दि. 7 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता गडचिरोलीतील अभिनव लॉनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘निर्धार नवपर्वाचा’ हा जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ना.धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वेगळा घरोबा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेचा (अजित पवार) हा पहिलाच कार्यकर्ता संवाद मेळावा असल्याने यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मेळाव्याच्या फलकावर शरद पवार यांच्या फोटोएेवजी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा लावण्यात आला आहे.
या मेळाव्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, इतर मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, माजी आमदार हरीराम वरखडे, जि.प.चे माजी सभापती नाना नाकाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, युवक, महिला, विद्यार्थी व सर्व फ्रंटलच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, रा.कॉ. महिला आघाडीच्या अध्यक्ष शाहीन हकीम, रायुकॉचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम यांनी केले आहे.