राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे नियोजन बिघडले, रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम

गडचिरोली : जिल्ह्यात धर्मरावबाबा आत्राम यांनी सरकारमध्ये सहभागी होऊन कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बिघडलेली जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसची घडी बसविण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. परंतू दुपारी आयोजित हा मेळावा संध्याकाळी उशिरा सुरू होऊन रात्रीपर्यंत चालला. त्यामुळे या मेळाव्याचे नियोजन बिघडून कार्यकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यासाठी चाचपणी करणारा मेळावा अनिल देशमुख, पक्षाचे निरीक्षक राजेंद्र वैद्य यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. यासाठी चामोर्शी बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. कार्यकर्त्याना आणण्यासाठी वाहनांचीही सोय केली होती. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली होती. पण पाहुण्यांची प्रतीक्षा करता करता संध्याकाळ झाली. अखेर संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास पाहुण्यांचे आगमन होऊन मेळाव्याला सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.

दादांच्या राष्ट्रवादीत जुनेच पदाधिकारी कायम
दरम्यान ना.धर्मरावबाबांसोबत गेलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नव्याने नियुक्तीपत्र दिले. त्यात जिल्हाध्यक्षपदी रविंद्र वासेकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी लिलाधर भरडकर यांची नव्याने नियुक्ती केली. ना.धर्मरावबाबा यांच्या हस्ते मुंबईत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.