राष्ट्रवादी (एसपी)ला लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध

सज्ज होण्याची निरीक्षकांची सूचना

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आढावा बैठक गडचिरोलीतील फंक्शन हॉलमध्ये जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.18 ला झाली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठी तयारीला लागण्याची सूचना यावेळी पक्षाचे निरीक्षक तथा राज्य सरचिटणीस अतुल वांदिले यांनी कार्यकर्त्यांना केली.

यावेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा माजी निरीक्षक राजेंद्र वैद्य, राज्य सरचिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार, राज्य चिटणीस ॲड.संजय ठाकरे, ओम शर्मा, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, चामोर्शी बाजार समितीचे उपाध्यक्ष परमानंद मल्लिक, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत यांच्यासह विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना अतुल वांदिले म्हणाले, पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे मागील पाच दशकांहून अधिक काळापासून या देशातील दलित शोषित पीडित वंचितांकरिता काम करीत आहेत. त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा आणि पुढे होणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार म्हणाले, आपल्या पक्षाची भूमिका ही विकासाभिमुख आहे. दिवंगत आर.आर. पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांकरीता कोट्यवधि रुपयांचा निधी आणून जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला, जेष्ठ नागरिकांच्या सुविधांसाठी त्यांनी काम केले. मात्र जिल्ह्यात त्यांच्यानंतर विकास थांबलेला असल्याचे ते म्हणाले. इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक विजय गोरडवार यांनी तर संचालन शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर नागोसे आणि आभार किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश परसोडे यांनी मानले.