अहेरीतील रस्त्यांसाठी राष्ट्रवादी (एसपी)चे भीकमांगो आंदोलन

अधिकारी-कंत्राटदार आश्वासन विसरले

अहेरी : प्राणहिता ते अहेरी आणि अहेरी मुख्य चौक ते गडअहेरी या रस्त्यांची कामे मागील दोन ते अडीच वर्षांपासून कासवगतीने सुरु आहेत. या कामांची गती वाढविण्याची मागणी करूनही संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्षात कामात कोणतीही तत्परता दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भिक मांगो आंदोलन करत लक्ष वेधले.

या रस्त्यांच्या कामांची गती वाढवावी म्हणून यापूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी उपोषण केले होते. भाग्यश्री आत्राम यांनीही आंदोलन केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारांनी 2 महिन्यात काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत कामात सुधारणा न केल्यामुळे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मुक्कावार यांच्या नेतृत्वाने भिक मांगो आंदोलन करण्यात आले.

यावेळी जमलेली रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपुर्द करण्यात आली. यावेळी श्रीनिवास विरगोनवार, श्रीनिवास चटारे, स्वप्नील श्रीरामवार, अफसरभाई, अब्दुल रहेमान, सुमित मोतकुरवार, मिलिंद अलोने व इतर नागरिक होते.