गडचिरोली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या आणि गडचिरोलीच्या वाट्याला काहीही दिले नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारला तारुण नेण्याकरता ज्या टिकड्यांवर सरकार उभे आहे त्या पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांना अर्थसंकल्पात भरभरून मदत केली आहे, मात्र उर्वरित राज्यांच्या तोंडाला पाणी पुसली. खास करून महाराष्ट्राला काहीही दिलेले नाही. गडचिरोली जिल्ह्याला तर भोपळाच आहे. युवकांच्या रोजगाराबाबत आणि महागाईबाबत अजिबात विचार करण्यात आलेला नाही. देशातील पुंजीपती लोकांच्या बाजूने हा संपूर्ण बजेट सादर करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली, असा आरोप करत या बजेटच्या विरोधात जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सायंकाळी पाच वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय गोरडवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.