अखेर युवक काँग्रेसमध्ये खांदेपालट, जिल्हाध्यक्षपदी नितेश राठोड यांची वर्णी

निष्क्रिय जिल्हाध्यक्षांना दिला डच्चू

गडचिरोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नितेश राठोड यांची नियुक्ती केली आहे. नितेश राठोड हे काँग्रेसच्या विविध संघटनेत आजपर्यंत कार्यरत होते.

युवक काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणून वर्णी लागल्यानंतर अनेक दिवस हे पद रिक्त होते. त्यानंतर माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पूत्र लॅारेन्स यांच्याकडे युकाँच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पण त्यांच्या निष्क्रियतेच्या चर्चा वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर त्यांना हटविण्यात आले.

याआधी नितेश राठोड यांनी गडचिरोली जिल्हा एन.एस.यु.आय.च्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे. तसेच जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव, गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरासुद्धा त्यांनी सांभाळलेली आहे.

राठोड यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान, तसेच गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व इतर पदाधिकाऱ्यांना दिले.