काँग्रेस आदिवासी आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी मडावी, शेडमाके प्रदेश सचिव

कुरघोडीच्या राजकारणात साधला सुवर्णमध्य

गडचिरोली : वन अधिकारी म्हणन सेवानिवृत्त झाल्यानंतर सात महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात दाखल झालेले हनमंतु गंगाराम मडावी यांची काँग्रेस पक्षाच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर यापूर्वी जिल्हाध्यक्षपद सांभाळलेले छगन शेडमाके यांची आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव म्हणून वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी सदर नियुक्त्या केल्या आहेत.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मडावी यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व स्वीकारत समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस प्रवेशानंतर कंकडालवार यांची अहेरी विधानसभा समन्वयक म्हणून, तर मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.

त्यांचा काँग्रेसमधील पक्षप्रवेश लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरसान यांच्यासाठी फायदाचा ठरला. दरम्यान आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा छगन शेडमाके यांची नियुक्ती झाल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने मडावी समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. दरम्यान ना.विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर पुन्हा हनमंतु मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान छगन शेडमाके यांना प्रदेशाध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी प्रदेश सचिवपदी नियुक्त करत असल्याचे पत्र देऊन सुवर्णमध्य साधला आहे.