गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या गुरूवारी झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे निखिल चरडे या युवा नगरसेवकाला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. याशिवाय नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचे यजमान सागर निंबोरकर, ज्येष्ठ भाजप पदाधिकारी सुधाकर येनगंधलवार आणि काँग्रेसकडून नंदू कायरकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अविरोध निवड करण्यात आली.
दुपारी 1 वाजता नगर परिषदेतील अध्यक्षांच्या कक्षात झालेल्या या बैठकीला सर्व नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी सभेचे कामकाज संचालित केले. भाजप आणि काँग्रेसच्या वतीने स्वीकृत नगरसेवकपदासाठी नामांकन भरले होते. निवडणूक अविरोध करण्यासाठी एका जागेवर काँग्रेसला संधी देण्यात आली. काँग्रेसचे गटनेते सतीश विधाते यांनी त्यासाठी नंदू कायरकर यांचे नाव निश्चित केल्याने त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. भाजपकडून गटनेते अनिल कुनघाडकर यांनी सागर निंबोरकर आणि सुधाकर येनगंधलवार यांची नावे निश्चित केली होती. तर उपाध्यक्षपदासाठी वॅार्ड क्र.12 चे नगरसेवक निखिल चरडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. सर्वांची व्हिडीओ चित्रिकरणात अविरोध निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे स्वीकृत सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते लिलाधर भरडकर यांनी आम्ही महायुती म्हणून भाजपच्या सोबतच असल्याचे स्पष्ट करत तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.
या मतदान प्रक्रियेदरम्यान सुरूवातीला न.प.उपाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे लगेच सभागृहातून निघून गेल्या. त्यामुळे त्या नाराज झाल्याची चर्चा न.प.च्या वर्तुळात सुरू होती.
यावेळी भाजपचे बहुतांश आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. मात्र माजी आमदार डॅा.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांच्यासह इतर पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते. आता विषय समित्यांच्या सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी ईच्छुक प्रयत्नशिल आहेत. ही निवड कधी होणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
































