बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गडचिरोलीत गुन्हा दाखल

आ.डॅा.मिलिंद नरोटे यांची तक्रार

गडचिरोली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये समाजात बदनामीकारक, खोटी माहिती प्रसारित करून अपमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोलीचे भाजपचे आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला.

यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गया (बिहार) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमात (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये मोदी यांच्यावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत ‘जुमले की दुकान’ असा उल्लेख केला. एवढेच नाही तर त्यांच्यावर व्यंगात्मक गाणेही टाकले. हा प्रकार पंतप्रधानांची बदनामी आणि अपमान करणारा तसेच समाजात तेढ निर्माण करणारा असल्याचे डॅा.नरोटे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले.

या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तेजस्वी यादव यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या 196, 356, 352 आणि 353 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. गडचिरोलीत पहिल्यांदाच एका माजी उपमुख्यमंत्र्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याने हा चर्चेचा विषय होत आहे.