कोरची : जनतेला खोटी आश्वासने देऊन मूर्ख बनविणाऱ्या भाजपने सत्ता आल्यावर देश लुटण्याचे काम केले. स्थानिक खासदारांनी 10 वर्षात एकही लोकोपयोगी काम केले नाही. एकतरी विकास काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. संवेदनशील अशा कोरची तालुक्यात इंडिया आघाडीच्या प्रचारादरम्यान ना.वडेट्टीवार बोलत होते.
दुर्गम भागात 11 तास लोडशेडिंग करून जनतेला जनावराप्रमाणे वागवणारे आता मते मागायला येत आहेत. भाजपचे खासदार काही काम न करता आता मोदींच्या नावाने मत मागत आहेत. अश्या खासदाराला घरचा रस्ता दाखवून इंडिया आघाडीप्रणित महाविकास आघाडीच्या उच्चशिक्षित, प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ.नामदेव किरसान यांना निवडून देऊन आपल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करा, असे आवाहन ना.वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी माजी आ.आनंदराव गेडाम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, भारिप नेते रोहिदास राऊत, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, राकाँचे तालुका अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, कॅामुनिष्ट पक्षाचे अमोल मारकवार, काँग्रेसचे परसराम टिकले, रामदास मसराम, अविनाश गेडाम, माजी नगराध्यक्ष मोहबंशी, अमोल नरोटे, सदरू बामानी, हकीमुद्दिन शेख, रामदास साखरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, प्रमोद पत्रे, राजरत्न मेश्राम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. विविध कर आकारून जनतेची लूट सुरू आहे. कोरची या भागात दिवसाला ११ तास लोडशेडिंग सुरू आहे. भर उन्हाळ्यात सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासासाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते यांनी उपस्थित केला.
आदिवासींच्या जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न, असो किंवा विविध समाजाच्या आरक्षणानुसार त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना हमीभाव, सिंचन प्रकल्प हे सर्व काँग्रेस काळातच झाले आहे. मोदीकाळात फक्त जातीय तेढ निर्माण करून समाजात भांडणे लावण्यात आली आहेत. जमिनीच्या मूळ मालकाला वनवासी म्हणून संबोधून त्यांची थट्टा करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. व्यापारी हित जोपासणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून व्यापाऱ्यांची कर्जमाफी केली ही लाजिरवाणी बाब आहे, असा निशाणा ना.वडेट्टीवार यांनी प्रचार सभेतून भाजपवर साधला.
प्रचारसभेला लोडशेडिंगचा फटका
जिल्ह्यातील अतिसंवेदनशील कोरची येथे इंडिया आघाडीप्रणित महाविकास आघाडीची प्रचार सभा सुरू असताना दोन वेळा वीज पुरवठा खंडित झााल. या सभेला लोडशेडिंगचा फटका बसला. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करून या परिसरातील लोडशेडिंग थांबली नाही तर संबंधितांना असा जाब विचारू की लोडशेडिंचा किती त्रास होतो हे त्यांना समजेल, असा इशारा त्यांनी सरकार आणि प्रशासनाला दिला.