विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी घेतली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची परेड

जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट व पाहणी

Oplus_0

गडचिरोली : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी (दि.16) गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी रिक्त असलेली तज्ज्ञ डॅाक्टरांची पदे, लिफ्टअभावी होणारे हाल, इमारतीला नसलेली फायर फायटिंग सिस्टम यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अपेक्षित असते. पण सरकारी यंत्रणा अनेक वेळा त्यात कुचराई करते. गृहजिल्हा असलेल्या गडचिरोलीमधील जिल्हा रुग्णालयाबाबत तक्रारी आल्यानंतर रविवारी विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला भेट दिली. विविध वॅार्डातील रुग्णांशी संवाद साधून त्यांनी तक्रारींची शहानिशा केली. तज्ज्ञ डॅाक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी पाठविण्याचा मुद्दा त्यांनी गांभिर्याने घेतला. गडचिरोली जिल्ह्यात एकही पद रिक्त न ठेवण्याचा शासन निर्णय असताना अनेक तज्ज्ञ डॅाक्टरांची पदे रिक्त असल्याबद्दल शासनाला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.

मी आपत्ती व्यवस्थापनमंत्री असताना भंडाऱ्याच्या रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर गडचिरोलीच्या रुग्णालयाला फायर फायटिंग सिस्टम लावण्यासाठी निधी दिला होता, पण अद्याप ती सुविधा का झाली नाही? या त्यांच्या प्रश्नाचे अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते. यासंदर्भात त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मोबाईलवरून संपर्क करून धारेवर धरले. वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारचे आरोग्य सेवेकडे लक्ष नसून त्यांचे केवळ टेंडरमधून कमिशन लाटण्याकडे लक्ष असल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चांगली सेवा देण्याची सूचना केली. एवढेच नाही तर रुग्णांशी सौजन्याने वागा, असेही त्यांनी बजावले.