गडचिरोली : शेतमालाची आधारभूत किंमत ठरवताना उत्पादन खर्चाची गोळाबेरीज करून शेतकऱ्याला किमान 15 टक्के नफा मिळेल एवढा भाव दिला जातो. त्यानुसार राज्य शासनाने धान उत्पादकांना 4783 रुपये क्विंटल एवढ्या भावाची शिफारस केंद्राकडे केली होती, पण प्रत्यक्षात 2369 एवढा भाव देण्यात आला. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 24 हजारांचे नुकसान सहन करावे लागत आहे, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. ते बुधवारी गडचिरोलीत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडत त्याकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. धान उत्पादकांच्या व्यथा सांगताना ते म्हणाले, केंद्र सरकारने धानाला प्रत्यक्षात दिलेला भाव पाहता एकरी 2414 रुपये, म्हणजे एका एकरात किमान 10 क्विंटल धान पिकत असेल तर एकरी 24,140 रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी पालकत्व घेतलेल्या जिल्ह्यात ही स्थिती असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
पंचनामे नको, सरसकट मदत द्या
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्यासाठी सरकारकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. पण सॅटेलाईट सर्व्हेक्षणासह आधुनिक पद्धतीने पाहणी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली. कंपन्यांचे नुकसान झाले तर त्यांना सरसकट मदत करता, मग शेतकऱ्यांना का नाही? असा सवालही त्यांनी गडचिरोलीत माध्यमांशी बोलताना केला.
यावेळी प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, जिल्हाध्यक्ष निखील धार्मिक, जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण हेंडवे, संकेत गड्डमवार, लख्खन राऊत आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.