गडचिरोली : भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी एका वृत्तवाहिनीवरील लाईव्ह मुलाखतीत लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकीवजा आवाहन करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार डॅा.नामदेव किरसान यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.30) गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल केली.
अशा वक्तव्यातून भाजपची गोडसे प्रवृत्ती दिसून येत असून सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या भाजपने आपल्या प्रकक्त्यावर कारवाई का केली नाही? असा सवालही खासदारांनी उपस्थित केला. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्या प्रवक्त्यावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजित कोवासे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनिल कोठारे, रजनिकांत मोटघरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.