अहेरी : दक्षिण गडचिरोलीचे सत्ताकेंद्र असलेल्या अहेरीत राजकीय भूकंप झाला आहे. तत्कालीन आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते आणि सध्या काँग्रेसवासी झालेले अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्यावर 12 विरूद्ध 5 असा अविश्वास पारित झाल्याने त्यांना सभापतीपदावरून पायउतार व्हावे लागले. कंकडालवार यांच्यासोबत असलेले बाजार समितीचे 5 संचालक मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटात दाखल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडी महत्वपूर्ण मानल्या जातात.
एप्रिल 2023 मध्ये झालेल्या अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्पष्ट बहुमत घेऊन सत्ता प्रस्थापित केली होती. 18 सदस्य असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीवर कंकडालवार यांनी स्वतः दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी एका ठिकाणचा राजीनामा दिला होता. त्यांनी 10 विरुद्ध 7 अशा स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन केली होती. मात्र अवघ्या काही कालावधीत त्यांच्या सभापतीपदावर नाराज असलेल्या सदस्यांनी अविश्वास ठराव आणला. तो 12 विरुद्ध 5 अशा बहुमताने पारित झाला. त्यामुळे कंकडालवार यांचा सहकार क्षेत्रावरील पकड सैल झाल्याची चर्चा असून त्यांच्यासाठी या घडामोडी मोठा धक्का ठरला आहे.
कंकडालवार त्यांच्या गटाकडून निवडून आलेले रवींद्रबाबा आत्राम (उपसभापती), राकेश कुळमेथे, अनिल कर्मकार, मलुबाई ईश्टाम, सैनु आत्राम या पाच सदस्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटात दाखल होण्याचा निर्णय घेतला. धर्मरावबाबा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जनतेच्या हिताची काम करण्यासाठी माझ्यासोबत जुळणाऱ्यांचे स्वागत असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.